महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – गावातील सर्व लोकांना प्रेरणा देणारे काम एकटा माणूसही करू शकतो हे आतापर्यंत दशरथ मांझी यांच्यासारख्या अनेकांनी दाखवून दिले आहे. आसाममध्येही अशीच एक तरुणी आहे. ती दिवसातून सहा तास एकटी काम करून नद्यांचे पात्र स्वच्छ करते.
आसाममधील या पर्यावरणवादी कार्यकर्तीचे नाव आहे मुन्नी छेत्री. बदरापूरमधील बाघा बाजारमध्ये राहणारी ही 26 वर्षांची तरुणी अनेक नद्यांचे पात्र स्वच्छ करण्याचे काम एकटीच करीत असते. सुरुवातीच्या काळात एक शिक्षक आणि काही शेजारी तिच्या मदतीसाठी आले; पण एकाच दिवसाच्या कामानंतर त्यांचा उत्साह मावळला! त्यानंतर मुन्नी एकटीच सहा तास काम करून नदीचे पात्र व काठ स्वच्छ करते. बराक खोर्यातील स्वच्छतेसाठी सरकारनेही हाक दिली आहे व मुन्नीने अंतःकरणापासून या हाकेला प्रतिसाद दिला आहे. ती पहाटे सहा वाजताच घरातून निघते व बराक आणि कुशियारा नद्यांचे पात्र ठिकठिकाणी जाऊन स्वच्छ करते.