महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – भाविकांनी दर्शनासाठी येताना अगोदर ऑनलाइन पास काढूनच यावे, असे आवाहन साई संस्थानने केले असले तरी श्रद्धेचे भुकेले भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे धाव घेताना दिसत आहेत. रविवारी मोठी गर्दी झाली. बायोमेट्रिक पास मिळवण्यासाठी सुमारे तीन ते चार तास रांग लावून उभे राहावे लागल्याने भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. साई संस्थान प्रशासनाने शासनाच्या आदेशाचे पालन करत मंदिर परिसराच्या आतील बाजूस चांगले नियोजन केले असले तरी बाह्य बाजूस मात्र पोलिस प्रशासन बेदखल असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
मोफत पास मिळवताना चार-चार तास रांगेत उभे राहताना भाविक दिसत आहेत. मात्र, पास वितरण कक्ष जवळ नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागला असल्याची प्रतिक्रिया देत “साईबाबांवर आमची श्रद्धा आहे, बाबांच्या दर्शनासाठी आम्हाला जिवाची पर्वा नाही. दर्शन महत्त्वाचे आहे. साई संस्थान प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली आहे,’ असे भाविकांनी बोलून दाखवले.
लाॅकडाऊनमुळे आठ महिने साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. शासनाच्या आदेशानुसार मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थान प्रशासनाने शासनाच्या नियम-अटींचे पालन करत दर्शन व्यवस्था केली आहे. सुमारे पंधरा हजार भाविकांना दर्शन दिले जाते. मात्र, गर्दीचे प्रमाण शासकीय सुट्या, रविवार, शनिवार, गुरुवार या दिवशी वाढत असल्याने संस्थानने भाविकांना ऑनलाइन पास काढूनच मग दर्शनास यावे, असे आवाहन केले असले तरी भाविक त्याचे पालन न करता दर्शनासाठी येत आहेत. रविवारी (१७ जानेवारी) भाविकांची मोठी गर्दी झाली