महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ जानेवारी – पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी राजकीय वाद पेटला. व्हिक्टोरिया स्मारकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड नाराज झाल्या. कारण होते ममतांच्या भाषणावेळी ‘जय श्रीराम’च्या दिलेल्या घोषणा. यावर ममता म्हणाल्या, “सरकारी कार्यक्रमात मर्यादा पाळल्या जाव्यात. पंतप्रधानांनी कोलकाता दौरा केला याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मात्र, कुणाला निमंत्रित करून त्यांचा अवमान करणे योग्य नाही. मी आता भाषण करणार नाही… जय हिंद, जय बांगला.’ ममतांनी असे नाराज होत भाषण संपवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू झाले.
मोदी म्हणाले, “नेताजींनी जगातील सर्वात मोठ्या सत्तेसमोर ठामपणे उभे राहत आव्हान दिले होते… मी स्वातंत्र्य मागणार नाही, हिसकावून घेईन. नेताजींमध्ये हे धाडस होते. आजचा दिवस हा नेताजींच्या जन्मदिन नव्हे, या दिवशीच खऱ्या अर्थाने सबंध भारताच्या स्वाभिमानाचा जन्म झाला होता. हावडा-कालका मेल आता नेताजी एक्स्प्रेस नावाने ओळखली जाईल.’ मोदी पुढे बोलताना म्हणाले, जगात जेव्हा महिलांना समानाधिकार देण्याच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा नेताजींनी महिला रेजिमेंट स्थापन करून त्यांना लष्करात भरती केले होते. लाल किल्ल्यावर भारताचा ध्वज फडकावण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मी पण लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला तेव्हा आझाद हिंद सेनेचीच टोपी परिधान केली होती. लक्ष्य गाठण्यासाठीचे नेताजींचे प्रयत्न मला नेहमी प्रेरणा देतात.