महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २९- तुळजापूर – मंगळवार, शुक्रवार, रविवार अन् पाैर्णिमेला 10 हजार जास्त पास ,तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमेला ३० हजार, तर इतर दिवशी २० हजार दर्शन पास देण्यात येतील. सशुल्क दर्शन ३०० रुपयांऐवजी २०० रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी (दि.२८) मंदिर संस्थान विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर संस्थानच्या विश्वस्तांची बैठक पार पडली. बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या मंदिरातील होमकुंड, साडी आदी उत्पन्नाच्या बाबींच्या लिलावांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सशुल्क दर्शनासाठी प्रती व्यक्ती ३०० रुपये शुल्क कमी करून पूर्वीप्रमाणे १०० रुपये करण्याची मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी लावून धरली. मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरला नसल्याचे सांगून सशुल्क दर्शनासाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेची कुलधर्म कुलाचार पूजा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी अमान्य करत याचा निर्णय १५ फेब्रुवारीनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे आदींची उपस्थिती होती.

ही आहेत प्रस्तावित कामे, तीन स्काय वाॅक होणार
विविध ३ ठिकाणी स्काय वाॅक, घाटशीळ रोड वाहनतळ येथील दर्शन मंडप ते जुना दर्शन मंडप (२५० मीटर), जुना दर्शन मंडप ते अभिषेक मंडप (११० मीटर) व मंदिरातून बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर समोरून मंदिराबाहेर शुक्रवार पेठ मार्गावर (१५० मीटर) असे एकूण ३ स्काय वाॅक बांधण्यात येणार आहेत.
मंदिरातील विविध विकासकामे थंड बस्त्यात
मंदिरात उभारण्यात येणाऱ्या विविध स्काय वाॅकची रुंदी २.५ मीटर अत्यंत कमी असल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने मंदिरातील विविध विकासकामे थंड बस्त्यात टाकण्यात आली. मंदिरातील विविध विकासकामांबाबत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अभिषेक मंडप व आराधना हाॅल
बहुप्रतीक्षित अभिषेक मंडप मंदिराच्या पाठीमागे प्रांगणात भव्य ३ मजली अभिषेक मंडप व आराधना हाॅल बांधण्यात येणार आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था असणार आहे, तर रांगेतील भाविकांना बसण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय प्रत्येक मजल्यावर ४ असे एकूण १६ आराधना हाॅल असणार आहेत. क्षेत्रफळ ६ हजार ९१० वर्गमीटर असेल. भाविक क्षमता ९ हजार असणार आहे.