महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। मुंबई । पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर शिस्त पाळा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असतानाच येऊ घातलेला लॉकडाऊन टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा पर्याय राज्य सरकारसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पर्याय मान्य झाल्यास लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध येतील, वर्क फ्रॉम होम सुरू होईल आणि बाजारपेठा सरसकट उघड्या राहणार नाहीत. हे पर्याय स्वीकारले गेल्यास तो लॉकडाऊनचा नवा अवतार ठरू शकतो आणि अर्थातच असा लॉकडाऊन अजिबात आर्थिक नुकसानीचा नसेल. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळवणे हा एकमेव उपाय आहे. पण आता सुरू झालेली लोकल पुन्हा बंद करणे सर्वसामान्य मुंबईकरांच्या रोजगाराचा विचार करता शक्य नाही. या विचारातूनच लॉकडाऊन टाळणारा सहा पर्यायांचा फॉर्म्युला पालिकेने तयार केला.
राज्य सरकारने हे पर्याय स्वीकारून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यासाठी पालिका प्रशासन राज्य सरकारशी लवकरच चर्चा करणार आहे. पालिकेने सुचवलेले पर्याय मान्य केल्यास लोकलमधील प्रवाशांची गर्दी किमान 50 ते 60 टक्के कमी होईल, असा विश्वास पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला. या पर्यायामुळे नागरिकांना आपल्या नोकर्याही गमवाव्या लागणार नाहीत, तर दुसरीकडे लोकलमधील गर्दीला आवर घालता येईल, असे या अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
1. प्रत्यक्ष कामावर हजर राहणे आवश्यक असलेल्या कर्मचार्यांनाच प्रवास करण्याची मुभा देणे.
2. घरूनच ऑनलाईन काम करण्यावर अधिकाधिक भर देणे.
3. शासकीय-निमशासकीय महापालिका खासगी कार्यालयांतील कर्मचारी संख्या किमान 15 दिवसांसाठी 50 टक्क्यांवर आणणे.
4. लोकलची तिकीटविक्री पूर्णपणे बंद करणे. ऑनलाईन तिकीट व मासिक पासवर बंदी आणणे. म्हणजे अनावश्यक कुणीही लोकलमध्ये चढणार नाही.
5. दुकानांच्या वेळा बदलणे, सम व विषम संख्यानुसार दुकाने सुरू ठेवल्यास बाजारपेठेतील गर्दीदेखील कमी होईल आणि संसर्गाचा वेग मंदावण्यास मदत होईल.
6. वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, कर्जत, पालघर, नवी मुंबई येथून मुंबईकरीता एसटी बसला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी म्हणजे लोकल प्रवासाला तो एक मर्यादित पर्याय ठरू शकेल, असे पालिकेला वाटते.