गॅसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ; हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। गडचिरोली। :गोरगरीब कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना आणली. कमी उत्पन्न गटातील कुटुंबात या योजनेतून गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्यातील २० हजारांवर गृहिणींना मोठा दिलासा दिलाख पण आता गॅसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गॅसचा हंडा घेणे अनेक कुटुंबांसाठी अशक्य होत आहे. परिणामी घरात गॅस कनेक्शन असूनही ६७६४ कुटुंबीयांनी चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.

उज्ज्वला गॅस योजनेतून शहराच्या ग्रामीण भागापर्यंत एकूण २० हजार ८३३ कुुटुंबांमध्ये पहिल्यांदाच गॅस कनेक्शन मिळाले होते. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचण्यासाठी गावोगावी गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात आले. अर्थात नंतरच्या रिफिलिंगमध्ये शेगडी आणि हंड्याचे पैसे जोडण्यात आले. अनेक घरी गॅस कनेक्शन कायम आहे, पण सिलिंडर रिकामे पडून आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही योजना शासनाने गुंडाळली की काय, असे चित्र आहे. चंद्रपूर येथे बसणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतरही संबंधित अधिकारी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत. यापूर्वी ६७६४ जणांनी उज्ज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केले होते. गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे हंडा भरून न घेणाऱ्यांची संख्या आता १० हजारांच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी गॅस रिफिलिंग केलेले हंडे मिळण्याची सुविधा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *