महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – पाटणा – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सर्व नागरिकांना मोफत करोना लस देण्याचं आश्वासन नितीश सरकारनं दिलं होतं. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपलं आश्वासन पूर्ण करण्याचा ध्यास घेतलाय. १ मार्चपासून अर्थात आजपासून देशभरात सुरू झालेल्या करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना राज्यात मोफत लस मिळेल, अशी घोषणा बिहार सरकारकडून करण्यात आलीय.
जवळपास पुढच्या सहा आठवड्यांपर्यंत सुरू राहणारा करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून सरकारी रुग्णालयांत नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. तर आयुष्मान भारत PMJAY अंतर्गत १० हजारांहून अधिक खासगी रुग्णालय, सीजीएचएस अंतर्गत ६०० हून अधिक रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांना सरकारी योजनांतर्गत लसीकरण केंद्रांच्या रुपात निर्धारित करण्यात आलंय. या खासगी रुग्णालयांना कोविड १९ लसीच्या प्रत्येक डोससाठी २५० रुपये शुल्क आकारण्याची मुभा देण्यात आलीय. मात्र बिहारमध्ये खासगी रुग्णालयांत दिल्या जाणाऱ्या करोना लशीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत खासगी रुग्णालयांतही नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीदरम्यान बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत करोना लस देण्यात येईल, असं आश्वासन नितीश कुमार यांच्याकडून देण्यात आलं होतं. निवडणुकीनंतर गठीत नितीश मंत्रीमंडळाकडून या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती.