महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – कोरोना संकट काळात आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कोरोना येण्यापूर्वी लोक आरोग्याप्रती म्हणावे तेवढे अॅक्टिव्ह नव्हते. मात्र, ते आता प्रकृतीकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहेत. यासाठी अनेक पर्याय अमलात आणले जात आहेत. यामध्ये नियमितपणे चालण्याचाही समावेश आहे.
विशेषज्ज्ञांच्या मते, तंदुरुस्त राहण्यासाठी ‘चालणे’ हा अत्यंत चांगला व्यायाम आहे. यामुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो. मात्र, रोज किती चालावे, हा एक नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. यासंदर्भात अनेक शोध करण्यात आले आणि करण्यात येत आहेत. यापूर्वीच्या काही संशोधनातून रोज किमान 10 हजार पावले चालण्याचा सल्ला देण्यात आला होता.
यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार तंदुरुस्त शरीर आणि दीर्घायुष्यासाठी रोज 10 हजार पावले चालण्याची गरज नाही. यासाठी व्यक्तीला रोज किमान 4400 पावले चालण्याची गरज आहे. ‘जर्नल जामा इंटरनल मेडिसीन’ नामक जर्नलमध्ये यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामधील निष्कर्षानुसार तंदुरुस्त शरीर आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी रोज किमान 4400 पावले चालणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, यापेक्षा जास्त चालल्याने आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. शक्य झाल्यास दिवसात 7500 पावले तरी चालावे. यासोबतच 20 मिनिटांचा व्यायाम केल्यास त्याचा शरीराला आणखी लाभ मिळतो.