सुकाणू समितीची महत्त्वाची बैठक ; पुण्यात कोणते नवे निर्बंध लावणार?; बैठकीकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – पुणे – पुणे: करोना साथीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात कराव्या लागणाऱ्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावायचे निर्बंध, याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी सुकाणू समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. विभागीय आयुक्तसौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, यावर चर्चा होणार असून, या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत त्याचे सादरीकरण केले जाणार आहे. ( Coronavirus In Pune Latest News )

सुकाणू समितीची ही बैठक काउन्सिल हॉल येथे होणार आहे. विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, आरोग्य आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.बैठकीत वाढती रुग्णसंख्या रोखणे आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी करायच्या उपाययोजना यावर चर्चा करून नियोजन केले जाणार आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांकडून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. त्याचा अहवालही या आठवड्यात दिला जाणार आहे. त्यानंतर पुण्यात कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालय एक महिना बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी फक्त पार्सल सेवा सुरू ठेवणे, बार बंद करणे; तसेच लग्न समारंभ येत्या दोन महिन्यांसाठी बंद ठेवणे यांसारखे निर्बंध लावले गेल्यास किती प्रमाणात रुग्णसंख्या कमी होईल, याबाबत या संस्थांकडून विश्लेषण केले जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय करायचे, याबाबत सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालकमंत्री अजित पवार हे येत्या शुक्रवारी करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्या आढावा बैठकीत करण्यात येणाऱ्या सादरीकरणाबाबत सुकाणू समितीच्या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. खाटांची उपलब्धता, रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांची सेवा घेणे, मनुष्यबळाची व्यवस्था, कोविड केअर सेंटर आणि जम्बो सेंटरमध्ये करायची तयारी याबाबतही बैठकीत नियोजन होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *