२०२० फेब्रुवारी पेक्षा २०२१ फेब्रुवारीत घर खरेदी झाली दुप्पट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ -मुंबई – २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात घर खरेदीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुंबईत फेब्रुवारी महिन्यात तब्बल १०,१७२ घरे विकली गेली. मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याची तुलना करता यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दुप्पट घरे विकली गेल्यामुळे मुंबईतील गृह क्षेत्रास मोठा दिलासा मिळाला आहे. २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत ५,९२७ घरे विकली गेली होती. स्टॅम्प ड्युटीमध्ये मिळालेली सवलत तसेच घरांच्या न वाढलेल्या किमती या दोन प्रमुख कारणांमुळे कोरोना काळातही फेब्रुवारी महिन्यात घर खरेदीमध्ये वाढ झाली.

याविषयी क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी सांगितले की, राज्य शासनाने केवळ मुंबई महानगर क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्राच्या फायद्याचे निर्णय घेतले. यामुळे मागील काही महिन्यांपासून घर खरेदीमध्ये वाढ झाली आहे. २०२० च्या डिसेंबर महिन्यात १९,५८१ एवढी विक्रमी घरखरेदी नोंदविली गेली.

मार्च महिन्यातदेखील नागरिक घर खरेदीला चांगला प्रतिसाद देतील, अशी आशा आहे, तर नरेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, कोरोना काळातही सरकारच्या वतीने जीडीपी आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली. स्टॅम्प ड्युटीमधील सवलत व कमी व्याज दर यामुळे ग्राहक घर खरेदी करण्यास प्रवृत्त झाले. मागील वर्षात सरकारने पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीतदेखील मोठी वाढ केली. तसेच लसीकरण मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आशावादी भावना निर्माण झाली आहे. यामुळे २०२१ हे वर्ष गृह क्षेत्रासाठी अत्यंत फायद्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *