अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन आहे. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाईन घेण्यात आले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे ,अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणार्‍या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षक व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधान परिषदेत बोलत होत्या. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *