नव्या नियमांमुळे आता स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळणं अधिक सोपं; जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – नवीदिल्ली – ग्राहकांना एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) वेळेवर मिळण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील नवे नियम सरकार लागू करणार आहे. त्यानुसार, आता ग्राहक एका डीलरऐवजी (Dealer) कोणत्याही तीन डीलरकडून एलपीजी सिलिंडरचं बुकिंग करू शकतील. म्हणजेच तुम्ही एखाद्या डीलरचे नोंदणीकृत ग्राहक असाल, त्या डीलरकडून वेळेत गॅस सिलिंडर उपलब्ध होणार नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या दुसऱ्या गॅस डीलरकडूनही सिलिंडर घेऊ शकणार आहात. अनेकदा असं होतं, की डीलरकडे गॅस सिलिंडरचा तुटवडा असतो. त्यामुळे नंबर लावूनही वेळेत सिलिंडर मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन आता अशा वेळी दुसऱ्या डीलरकडून सिलिंडर घेण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.

ऑइल सेक्रेटरी तरुण कपूर (Tarun Kapoor) यांनी सांगितलं, की केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसच्या नव्या जोडणीसंदर्भातही (New Gas Connection) नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ग्राहकांना कमी कागदपत्रांमध्ये गॅसची नवी जोडणी मिळू शकेल. अॅड्रेस प्रूफ अर्थात निवासाच्या पत्त्याशिवायही नवी गॅस जोडणी देण्याच्या संदर्भातही विचार सुरू आहे. सध्या एलपीजीच्या (LPG) नव्या जोडणीसाठी अॅड्रेस प्रूफ (Address Proof) अत्यावश्यक असतं. शहरात राहणाऱ्या अनेकांकडे हा कागद नसतो. गावाकडून तो कागद आणणं मुश्कील असतं. त्यामुळे त्याशिवाय जोडणी देण्याबद्दल विचार सुरू असल्याचं तरुण कपूर यांनी सांगितलं.

इंडियन ऑइलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी अगोदर देशाच्या वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वेगवेगळे मोबाइल नंबर होते. आता देशातल्या या सर्वांत मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सगळ्या सर्कल्ससाठी एकच नंबर जाहीर केला आहे. इंडेन गॅसच्या देशभरातल्या गॅस ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी आता 7718955555 या क्रमांकावर कॉल करावा लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *