आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प, पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत दिलासा देणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प (State Budget 2021) सोमवारी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात तीन पक्ष एकत्र येत महाराष्ट्रात नवीन सत्ता समीकरण राज्याने पाहिलं. मागील अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला असला तरी मागील वर्षी संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट होते.

कोरोनामुळे राज्य सरकारने घोषित केलेल्या वेगवेगळ्या विकास योजना तसंच विकास निधी यांना कात्री लावत फक्त वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवा यासाठी निधीची तरतूद करावी लागली. आता सोमवारी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला काय दिलासा मिळणार याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तोंडसुख घेतले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांवर देखील टीकात्मक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणार की हवेचा बुडबुडा निघणार याकडेच विरोधी पक्षनेत्यांचे लक्ष आहे.

राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती ही आर्थिक पाहणी अहवालाद्वारे समोर आली आहे. महसुली तूट पाहता प्रशासकीय खर्च आणि कर्जाचा बोजा या परिस्थितीत राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कोणत्या योजना असतील याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार कृषी विषयक काही नवीन योजना आणणार आहे. त्याद्वारे राज्यात शेतकरी अल्पभूधारक यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे.

सरकारच्या उत्पन्नात भर पाडणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन शुल्क. सिगारेट यासारख्या गोष्टींवर कर वाढवत असताना राज्यात पेट्रोल-डिझेल याबाबत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही समजतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी जोरदार तोंडसुख घेतलं होतं. पण त्यावेळेस सध्याची आर्थिक परिस्थिती आणि त्यातून काढलेला मार्ग या आधारे हे बजेट होतं, असा युक्तिवाद भाजपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर आता राज्यातील अर्थसंकल्पामध्ये अजित पवार नेमका कोणता दिलासा देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे लोकसभेतील भाषणामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची कार्यपद्धती आणि अर्थमंत्री म्हणून केलेली कामगिरी याबाबत मोठं कौतुक केलं होतं. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार नेमकी काय जादू दाखवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *