महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । पुणे । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे या संघटनांनी पुढील आठवड्यात सलग दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. यामुळे उद्यापासून केवळ एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. जर तुमचे काही महत्वाचे काम असेल तर आज आणि शुक्रवारीच बँका सुरु राहणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
खासगीकरणाविरोधात सरकारी बँकांचे कर्मचारी 15 आणि 16 मार्चला संपावर जाणार आहेत. नऊ बँक युनियनची केंद्रीय संघटना यूनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने या संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम सरकारी बँकांच्या कामकाजावर होणार आहे.देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावरही या संपाचा मोठा परिणाम होणार आहे. बँकेनेही स्टॉक एक्स्चेंजला याची माहिती दिली आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी दोन दिवसीय संपाचा परिणाम बँकेच्या कामावर पडण्याची शक्यता असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.या संपाचा परिणाम बँक ग्राहकांवरही होणार आहे. 15 मार्चला सोमवार आणि 16 मार्चला मंगळवार आहे. आठवड्याचा पहिले दोन दिवस संपात गेल्याने कामे खोळंबणार आहेत.
त्या आधी 11 मार्चला महाशिवरात्र असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. यामुळे बँका बंद राहणार आहेत. 12 मार्चलाच बँका सुरु राहणार आहेत. त्यानंतर 13 मार्चला दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील. तर 14 मार्चला रविवार असणार आहे. जर बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 11 मार्चआधीच म्हणजे आजच संपवा. नाहीतर 11 मार्च ते 16 मार्च अशा सहा दिवसांमध्ये केवळ एकच दिवस कामकाज सुरु असल्याने बँकांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.