महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । मुंबई । राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 14 ऐवजी 21 मार्चला होणार आहेत. परंतु नेमकी त्याच दिवशी रेल्वेकडून विविध पदांसाठी घेण्यात येत असलेली परीक्षादेखील आहे. एकाच दिवशी असलेल्या या परीक्षांमुळे दोन्ही परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा मोठा घोळ सुरू आहे. आतापर्यंत राज्य सेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा रेल्वेची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. रेल्वेच्या 32 हजार 208 जागांसाठी पाच टप्प्यांत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. रेल्वेची पूर्वनियोजित परीक्षा असतानाही एमपीएससीनेही त्याच तारखेला परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेसह एमएपीएससीच्या परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना कोणती तरी एकच परीक्षा देणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड
कोरोनामुळे शहरातील विद्यार्थी गावी परतले. या विद्यार्थ्यांनी 14 मार्चला होणार्या एमपीएससी परीक्षेला येण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले. मात्र एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड बसला. आता ही परीक्षा 21 मार्च रोजी होणार असल्याने त्यांना पुन्हा आरक्षण करावे लागणार आहे.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच हॉटेल बंद राहणार असल्याने घरच्या शिदोरीवरच परीक्षा द्यावी लागणार आहे. निर्बंध कडक असलेल्या शहरामध्ये राहण्याची सोय होणार नसल्याने परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागणार आहे.