आता पर्यंत इतक्या ग्राहकांची वीज तोडली

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पुणे । महावितरण कंपनीकडून वीज बिल न भरणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील 80 हजार 591 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 54,034, सांगली 4,342, सोलापूर 8,138 व सातारा जिल्ह्यातील 9,736 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वेगवेगळ्या पथकांद्वारे वीज जोडण्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये थकीत रक्कम न भरता आजूबाजूच्या मीटरमधून किंवा अन्य प्रकारे परस्पर वीजपुरवठा घेतल्यास विद्युत कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिनाभरात 479 कोटी 64 लाख रुपये थकीत वीज बिल भरले. खंडीत वीज पुरवठा परस्पर जोडून घेतल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद देत एक महिन्यात 4 लाख 1 हजार 700 थकबाकीदार वीज ग्राहकांनी 479 कोटी 64 लाख रुपये थकीत बिल भरले. यामध्ये सर्वाधिक 3 लाख 52 हजार 380 घरगुती ग्राहकांनी 303 कोटी 37 लाख, 41 हजार रुपये, 620 वाणिज्यिक ग्राहकांनी 120 कोटी 40 लाख तर 7660 औद्योगिक ग्राहकांनी 55 कोटी 56 लाख रुपये भरले आहेत. अद्यापही 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे 1384 कोटी 57 लाख रुपये थकबाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 62 हजार 225 ग्राहकांकडे 255 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे जिल्हा 738 कोटी 13 लाख, सातारा जिल्हा 75 कोटी 33 लाख, सोलापूर जिल्हा 178 कोटी 65, सांगली जिल्ह्यात 136 कोटी 47 लाख थकबाकी आहे. अद्यापही थकबाकी जास्त असल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू राहणार आहे.

सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू  चालू व थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *