महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । नवीदिल्ली ।व्हॉट्सॲपला नवे गोपनीयता धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) आणि सेवा शर्ती लागू करण्यापासून रोखावे, अशी विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला केली. व्हॉट्सॲप हे धोरण १५ मेपासून सर्व युजर्ससाठी अनिवार्य करत आहे. त्याबाबत विविध वर्गांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाला नवे धोरण रोखण्याचे आवाहन केले. व्हॉट्सॲपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
व्हॉट्सअॅपसह इन्स्टाग्राम आणि फेसबुकही शुक्रवारी रात्री सुमारे ४० मिनिटे डाऊन झाले होते. भारतासह अनेक देशांत ही समस्या उद्भवली. तांत्रिक कारणामुळे या सेवा डाऊन झाल्याचे सांगितले जाते.