महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पुणे । पुणे पोलीस आता सायकलवरुन पेट्रोलिंग करणार आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून दहा सायकल देत प्रस्तावाला पालिका प्रशासनाने ग्रीन सिग्नल दिला. स्टिक आणि बॉटल स्टॅण्डची व्यवस्था दहा अद्यावत सायकलमध्ये केली आहे. सोबतीला त्याच भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित देखील केली आहे. पोलीस प्रशासनाने वाढते इंधन दर आणि पर्यावरणपूरक पेट्रोलिंग व्हावे या दृष्टीने सायकल पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील पेठांचा परिसर म्हणजे अगदी दाटीवाटीचा परिसर असून मोठी पोलीस वाहन आणि मुबलक वाहनांची संख्या बघता जास्तीच पोलिसांना पेट्रोलिंग करता येत नव्हते. पोलिसांच्या बरोबरचा प्रत्यक्षात नागरिकांचा वावर अधिक वाढावा, नागरिकांना सुरक्षित वाटेल असा हा निर्णय असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. तर पोलिसांच्या फिटनेस आणि इंधन खर्चाच्या दृष्टीने देखील चांगला निर्णय ठरेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे. सायकल पेट्रोलिंगचा असलेला उद्देश किती यशस्वी होणार याची उत्सुकता असली तरी दुसरीकडे हा सायकल पेट्रोलिंगचा प्रयोग हटके असल्यामुळे त्याची चर्चा पुण्यात होत आहे.