महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – भारत आणि इंग्लंड मधील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना उद्या (रविवारी) पुण्यात रंगणार आहे. या मालिकेत भारताने कसोटी व टी-20 अशा दोन्ही मालिका जिंकल्या असून येथे आज विजय संपादन करत मालिकाविजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचा विराटसेनेचा प्रयत्न असणार आहे. येथील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.
पहिल्या दोन्ही सामन्याप्रमाणे तिसऱया सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्मयता आहे. भारताकडून राहुल आणि कोहलीने दोन्ही सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे, तर रोहित दोन्ही सामन्यात स्टार्ट घेऊन बाद झाला आहे. धवनने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली, तर दुसऱया सामन्यात त्याने केवळ 4 धावा केल्या. रोहित आणि धवनला आपल्या फलंदाजीत सातत्य ठेऊन भारताला चांगली सलामी मिळवून द्यावी लागणार आहे. अय्यरच्या जागी संधी मिळालेल्या ऋषभ पंतने धडाकेबाज अर्धशतक ठोकून आपले नाणे खणखणीत वाजविले आहे. त्यामुळे सूर्यकुमारला अजून वेटिंगवर रहावे लागणार आहे. पंडय़ा ब्रदर्सही फलंदाजीमध्ये आपले योगदान देतील.
भुवनेश्वरसोबत टी. नटराजन किंवा महंमद सिराजला तिसऱया सामन्यात संधी मिळू शकते. कुलदीपला पहिल्या दोन्ही मॅचमध्ये आपला ठसा उमटवला आला नाही. दुसऱया सामन्यात कुलदीपने आपल्या 10 षटकात तब्बल 84 धावांची लूट केली होती. दोन्ही सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे कदाचित त्याच्याऐवजी यजुवेंद्र चहलला संधी मिळू शकते. दुसऱया सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली होती. भारताला पाचव्या बॉलरची उणीव भासत आहे. दोन्ही सामन्यात कृणाल पंडय़ाचा पाचवा बॉलर म्हणून भारताने वापर केला, पण तो यशस्वी होताना दिसला नाही. त्यामुळे भारताला 10 षटके सक्षमपणे टाकू शकेल, अशा पाचव्या बॉलरची गरज आहे.
इंग्लंडला फलंदाजीची चिंता नाही
दुसरीकडे इंग्लंडला फलंदाजीची चिंता नाही. जॉनी बेअरस्ट्रो, जेसन रॉय यांच्यासोबत बेन स्टोक्सचे फॉर्मात येणे ही इंग्लंडसाठी जमेची बाजू आहे. त्यांच्यासोबतच बटलर, डेविड मलान, लिव्हिंगस्टोन अशी फलंदाजीची फळी आहे, तर इंग्लंडकडे करन बंधू, स्टोक्स, टॉप्ली, रशीद बॉलिंगची बाजू सांभाळतील. इंग्लंडकडला गोलंदाजीची चिंता आहे. दोन्ही सामन्यात भारताने 300 धावांच्या वर धावसंख्या रचली आहे. त्यामुळे इंग्लंडला गोलंदाजीच्या बाजूवर मेहनत घ्यावी लागणार आहे.
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड – मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (कर्णधार), सॅम करण, टॉम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, अदिल रशिद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड, डेव्हिड मलान. राखीव ः जेक बॉल, ख्रिस जॉर्डन.
सामन्याची वेळ- दुपारी 1.30 पासून.