महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २ एप्रिल । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 3 एप्रिलपासून बारावी परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवरील कॉलेज लॉगइनमधून ज्युनियर कॉलेजने हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यायचे असून विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाची प्रिंट द्यायची आहे.
हॉल तिकिटाच्या प्रिंटआऊटसाठी विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत. तसेच सदर प्रिंटवर प्राचार्यांची सही, शिक्का असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर विषय, माध्यम बदल तसेच काही दुरुस्त्या असतील तर प्राचार्यांनी विभागीय शिक्षण मंडळात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हॉल तिकिटावरील विद्यार्थ्याचे नाव, सही, फोटो यासंदर्भातील दुरुस्त्या कॉलेजस्तरावर पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही भोसले यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित ज्युनियर कॉलेजने दुसरी प्रिंट विद्यार्थ्याला उपलब्ध करून द्यावी. तसेच त्या प्रिंटवर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा लिहावा, असेही राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.