महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ५ एप्रिल ।आगामी काही दिवसांत नागरिकांना पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत दर कमी होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आता कमी होऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याचा थेट फायदा ग्राहकांना दिला जाईल, असे प्रधान यांनी रविवारी सांगितले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे प्रधान यांना लोकसभेत सदस्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. लोकसभेत दरवाढीबाबतच्या चर्चेवेळी प्रधान यांनी गेल्या 7 वर्षांत दरवाढ झाल्याचे मान्य केले होते. पेट्रोल, डिझेलवर 459 टक्के करवाढ झाल्याची कबुली त्यांनी दिली होती.
घरगुती वापराचा सिलिंडर आणि रॉकेलच्या वाढत्या दराबाबतही प्रधान यांनी लोकसभेत माहिती दिली होती. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आणि रॉकेल यावरील अनुदान हळूहळू बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये सिलिंडर 594 रुपयांनी मिळत होता. त्याची किंमत आता 819 रुपये आहे.