महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ५ एप्रिल । छत्तीसगडच्या सुकमा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी शनिवारी शोधमोहिमेवरील संयुक्त कृती दलाच्या जवानांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 24 जवान शहीद झाले होते. या चकमकीत 9 नक्षल्यांचाही खात्मा करण्यात आला. शहीद जवानांमध्ये ‘कोब्रा बटालियन’चे 9, ‘डीआरजी’चे 8, ‘एसटीएफ’चे 6 आणि बस्तर बटालियनच्या एका जवानाचा समावेश आहे. दहा दिवसांत नक्षलवाद्यांनी हा दुसरा मोठा हल्ला केला असून नक्षल्यांनी शनिवारच्या हल्ल्याच्या रूपात भारताविरुद्ध देशांतर्गत युद्धच पुकारल्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सोमवारी छत्तीसगडमधील घटनास्थळी भेट देणार आहेत. ते या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मी शहीद जवानांच्या कुटुंबियांना विश्वास देतो की जवानांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद्यांविरोधात आमची लढाई आणखी मजबूत होणार आहे.’ असे शहा यांनी म्हटले आहे.
वीस दिवसांपूर्वी विजापुरातील तर्रेम परिसरातील जोनागुडा गावालगत मोठ्या संख्येने नक्षली लपलेले असल्याची माहिती संयुक्त सुरक्षा दलाला उपग्रहीय छायाचित्रांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती. त्यांना शोधण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या 700 जवानांना जोनागुडाच्या डोंगराळ भागाजवळ नक्षल्यांनी घेरले आणि गोळीबार सुरू केला. पाच तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. नक्षल्यांनी तिन्ही बाजूंनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान नक्षल्यांनी रॉकेट लाँचरसह एके 47 रायफलींचा वापर केला. चकमकीत 9 नक्षल्यांचाही खात्मा झाला. जवळपास 30 जवान जखमी झाले.