दहावी, बारावीच्या परीक्षां सदर्भातील निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ६ एप्रिल ।राज्यात सोमवारपासून जाहीर केलेल्या कडक निर्बंधामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि.०६) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. परीक्षांसदर्भातील निकाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. मात्र राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. कडक निर्बंध असताना विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे पोहचायचे, कोरोनाची लागण झाल्यास निर्माण होणारी परिस्थिती, परीक्षा पुढे ढकलण्यात येईल का? परीक्षा कशा पद्धतीने होईल, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

यापार्श्वभूमीवर मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील अधिकारी, राज्य मंडळाचे अधिकारी यांच्यासोबत झूमद्वारे ऑनलाईन बैठक घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *