महाराष्ट्र २४ – पुणे , स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी) घरी पोचविल्यानंतर रोख स्वरूपात पैसे स्वीकारण्यापेक्षा ग्राहकांनी डिजिटल पेमेंट करावे, यासाठी काही गॅसवितरक कंपन्या वितरकांना उद्दिष्ट ठरवून देत आहेत. त्यामुळे रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून व्यवहार करावा, यासाठी वितरक आग्रह धरत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
शहरात प्रामुख्याने हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी), भारत गॅस आणि इंडेन या तीन कंपन्यांमार्फत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर पुरविण्यात येतात. त्यातील “एचपी’ने आपल्या वितरकांना ग्राहकांकडून डिजिटल पेमेंट घेण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन आल्यानंतर ग्राहकांना ऑनलाइन पैसे देण्याची मागणी करीत आहे. त्यासाठी “एचपी’ने एक ऍप्लिकेशनही तयार केले आहे. तसेच, ग्राहकांना स्मार्ट कार्डही देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ग्राहकांकडे ऑनलाइन पैसे देण्याचे माध्यम नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
भारत गॅस किंवा इंडेन या कंपन्यांचाही डिजिटल व्यवहारांवर भर आहे. मात्र, वितरकांना त्याबाबत उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले नाही, असे या कंपन्यांच्या वितरकांनी स्पष्ट केले. आमचे सुमारे 15 टक्के ग्राहक डिजिटल पेमेंट करतात, असेही त्यांनी सांगितले.