महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१९ एप्रिल । सध्या देशात करोनामुळे खूपच बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात भयंकर परिस्थिती आहे. अशा वेळी जेव्हा संपूर्ण देशानं एकत्र येत या जागतिक महामारीची सामना करण्याची अपेक्षा होती. तिथे मात्र या उलट चित्र आहे. करोनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि पक्ष आपली पोळी भाजण्याचा पयत्न करताना दिसत आहे. करोनाचा वापर राजकारणासाठी करत असल्याचं चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे आणि मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं याकडे लक्ष वेधून घेत अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
करोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात फक्त महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर जगातही सुरू असलेल्या राजकारणावर तेजस्विनीनं नाराजी व्यक्त केली आहे. तिनं या राजकारणावर अतिशय कठोर शब्दात टीका केली आहे. तेजस्विनीची सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं लिहिलं, ‘सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षाही भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा. अवघड आहे सगळंच… काळजी घ्या’ देशातील परिस्थिती गंभीर असताना सुरू असलेलं राजकारण पाहता तेजस्विनीची ही पोस्ट सर्वांनाच विचार करायला लावते.