मनाला आवर घालण्याची पहिली पायरी म्हणजे काही काळ शांत राहणे ; स्वामी विवेकानंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। पुणे । मनावर नियंत्रण अतिशय कठीण आहे. त्याची तुलना माकडाशी केली गेली आहे. एक माकड होते, स्वभावधर्मानुसार त्यात उपजत चापल्य तर होतेच, मात्र एका माणसाने त्याला मद्य पाजले. दारू प्यायल्याने हे माकड वेडे झाले. त्यानंतर त्याला एका विंचवाने दंश केला. विंचवाने दंश केल्यावर ती व्यक्ती िदवसभर तडफडत राहते. त्याप्रमाणे विंचवाच्या दंशानंतर माकडाच्या अंगात जणू भूतच संचारले. माकड अधिक अस्थिर व चंचल झाले. माणसाचे मनही त्या माकडाप्रमाणे आहे. ते स्वभावाने चंचल आहे. बाह्य गोष्टींनी त्याची अस्थिरता वाढते. वासना मनाचा ताबा घेते तेव्हा आनंदी लोक िदसल्यावर ईर्षारूपी विंचू त्याच्या मनाला डंख मारतो. त्याला हेवा वाटायला लागतो. अहंकाररूपी पिशाच्च माणसात प्रवेश करते तेव्हा तो स्वत:शिवाय कोणालाच मोजत नाही.

म्हणूनच मनाला आवर घालण्याची पहिली पायरी म्हणजे काही काळ शांत राहणे आणि मनाला त्याच्या इच्छेनुसार भटकू देणे. मन चंचल असते. ते चंचल माकडाप्रमाणे इकडे तिकडे भटकेल. मात्र, शांत राहा आणि प्रतीक्षा करा. मनाची गती पाहा. लोक म्हणतात की, ज्ञान हीच खरी शक्ती आहे. हे अगदी खरे आहे. जोपर्यंत मनाच्या कृतींवर लक्ष ठेवणार नाही तोपर्यंत आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाही. मनाला इच्छेनुसार भटकू द्या. तुमच्या मनात अनेक वाईट भावना येण्याची शक्यता आहे. परंतु हळूहळू हा खेळ कमी होत चालला आहे याची जाणीव होईल. काही महिने ही संख्या हजारांची असेल, नंतर ती शेकड्यांवर येईल, तर काही महिन्यांनी ती शून्यावर येईल. मग मन पूर्णपणे आपल्याला वश होईल. मात्र, यासाठी दररोज धैर्याने याचा सराव करावा लागेल.

– स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’ पुस्तकातून साभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *