महाराष्ट्रात लसींचा तुटवडा ; १ मेपासूनच्या लसीकरणावर प्रश्‍नचिन्ह;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।निखिल गाडे । दि.२८ एप्रिल। मुंबई । महाराष्ट्रात लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने घोषणा केलेल्या 1 मेपासूनच्या 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 1 मेच्या लसीकरणासाठी डोस उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखविले आहे. मुंबई महानगरपालिकेने तर राज्य सरकारला लेखी पत्र पाठवून 1 मेपासूनचे लसीकरण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. 8 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात केल्यास लसीचा मोठा तुटवडा भासेल. एवढेच नाही तर नवीन केंद्र सुरू होईपर्यंत लस घेण्यासाठी उसळणार्‍या गर्दीला आवर घालणेही शक्य होणार नाही, असे मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लस उपलब्धतेचे आव्हान कायम आहे. 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना 12 कोटी डोस उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खासगीत बोलताना पुढील महिनाभर तरी आम्ही राज्यांना लस उपलब्ध करून देऊ शकणार नाही, असे म्हटल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत मंगळवारी दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी टोपे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *