महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१ मे । कोरोना कालावधीत रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील रेशन दुकानदार संघटनांनी शनिवार, १ मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदार संपावर गेल्यावर ऐन कोरोना कालावधीत शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे अवघड होणार आहे.
कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या रेशन दुकानदारांना आर्थिक मदत द्यावी, विमा संरक्षण कवच देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील 55 हजार रेशन दुकानदारांनी एक मे पासून धान्य वाटप बंद करीत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.या मागण्या वारंवार करूनही राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राज्य सरकारने विमा संरक्षण देण्याची तयारी दर्शवली; मात्र अद्याप हा प्रस्ताव धूळ खात पडला असल्याचे राज्य रेशन दुकानदार संघटनेने म्हटले आहे.
रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या –
# रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच आणि मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी तसेच 50 लाखांची मदत करावी.
# कोरोनामुळे संसर्ग होऊ नये, यासाठी शिधापत्रिकाधारकांचा थम्ब न घेता दुकानदाराचा थम्ब घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश द्यावेत.
# रेशन दुकानदारांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा किंवा फूड प्रोग्रामअंतर्गत 270 रुपये प्रतिक्विंटल कमिशन मार्जिन देण्यात यावे.
# धान्य वाटप करताना प्रतिक्विंटल एक ते दीड किलो येणारी घट ग्राह्य धरावी.
# दुकानदारांना दुकान भाडे, वीजबिल, स्टेशनरी खर्च देण्यात यावा.
# बंद ई-पॉस मशीन बदलून मिळाव्यात. मोफत धान्य वितरणाचे राहिलेले कमिशन देण्यात यावे.
# दुकानदारांनी दिलेली हमालीची रक्कम वाहतूक कंत्राटदाराकडून देयकातून वसूल करावी.