कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात मोफत लसीकरण करा, सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राकडे मागणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात मोफत लसीकरण मोहीम राबवा. या लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोरोना उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेल्या 35 हजार कोटींचा वापर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

देशात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी तर काही ठिकाणी तिसरी लाट आहे. कोरोनाचा धोका देशभरात वाढत चालला आहे. कोरोनाशी मुकाबला करताना ऑक्सिजनसह इतर अनेक आरोग्य सुविधा अपुऱया पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक रुग्णालयात आणि कोरोना सेंटर्समध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा सुरू राहावा यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर कोरोनाच्या धोक्यापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी देशातील नागरिकांचे तत्काळ लसीकरण केले जाणे आवश्यक आहे. देशभरात मोफत लसीकरण करा.

त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोरोना उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेल्या 35 हजार कोटींतील निधीचा वापर करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी एका संयुक्त पत्राद्वारे केली आहे. यात संयुक्त जनता दलाचे एच. डी. देवगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, डीएमके नेते स्टॅलिन, बसपा नेत्या मायावती, जम्मू-कश्मीर पीपल्स अलायन्सचे फारुख अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव, सीपीआयचे डी. राजा आणि सीपीआय-एमचे सीताराम येचुरी यांचा समावेश आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *