खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर – पालकमंत्री अशोक चव्हाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड । नांदेड । दि.४ मे । महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटुंबांसाठीची खावटी योजना पुनरूज्जीवित केल्याने नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबियांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजूर झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खावटी योजना पुनरूज्जीवित करण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गेल्या १ मे रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

या खावटी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी ४ हजार रूपयांचा लाभ दिला जाईल. यामध्ये २ हजार रूपये किंमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू तसेच २ हजार रूपये रोख बॅंक खात्यामार्फत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्य स्तरावर सुमारे ४८२ कोटी रूपये खर्च केले जातील. प्रामुख्याने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासीबहूल किनवट तालुक्याला मिळणार असून, आजपावेतो येथील ५ हजार १२७ अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७ तर भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.

या योजनेबाबत बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,यापूर्वी खावटी कर्जरूपात दिली जायची व ते कर्ज नंतर परत करावे लागायचे. या योजनेमध्ये मिळणारी रक्कम हे अनुदान स्वरूपात असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *