महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २१ मे ।रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहे. (CM Uddhav Thackeray Konkan Tour Today for Review Tauktae Cyclone affected district)
मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350, खेड तालुक्यात 30, गुहागर 05, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, राजापूर 32 असे मिळून एकूण 1 हजार 28 घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये 1, संगमेश्वरात 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरात 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्या, 09 शाळा, तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.
तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे. (CM Uddhav Thackeray Konkan Tour Today for Review Tauktae Cyclone affected district)