महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत. आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या ‘फिश प्रसादम’ औषधासोबत केली जात आहे.
दरम्यान हे आयुर्वेदिक औषध कोविड-19 वर प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-19 संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं.
हे औषध कोविड-19 वर प्रभावी आहे की नाही, तसंच हे औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचं पथक तसंच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.