सर्व प्रौढ भारतीयाचं लसीकरण वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सक्षम : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर 2021 पर्यंत किमान सर्व प्रौढांचं लसीकरण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे. देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हा दावा केला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “ऑगस्ट आणि डिसेंबर 2021 च्या दरम्यान भारताला 216 कोटी कोरोनाचे डोस उपलब्ध होणार आहेत तर जुलैपर्यंत 51 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सर्व प्रौढ भारतीयांचे आपण लसीकरण पूर्ण करु शकतो.”या बैठकीमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल आणि त्यामध्ये बालकांना असलेल्या धोक्यांवरही चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या आरोग्य सुविधा अपग्रेड केल्या जात असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत कोरोना लसीकरणामध्ये गती आणण्यावर भर दिला. तसेच केंद्र सरकारच्या वतीनं 70 टक्के डोस हे दुसऱ्या डोससाठी उपलब्ध केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील कोरोनाच्या लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार लस निर्मिती कंपन्यांना प्रोत्साहन देत असल्याचं सांगत त्यांनी येत्या काही महिन्यात देशातील कोरोनाच्या लसीकरणाला गती मिळेल असाही विश्वास व्यक्त केला. लहान राज्यांतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रेसिंग, उपचार आणि लसीकरण यासोबतच कोविड अॅप्रोप्रिएट बिहेव्हियरवर भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *