कोरोनावर लस; ब्रिटनचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- लंडन/बीजिंग/ : कोरोना विषाणूवर व्हॅक्सिन (लस) शोधून काढल्याचा दावा ब्रिटिश वैज्ञानिकांनी केला आहे. पुढील आठवड्यात लसीचे परीक्षण जनावरांवर केले जाईल. नंतर माणसांवर ती आजमावली जाईल. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे चीनमधील बळींची संख्या 600 वर पोहोचली आहे. बाधितांची संख्या 28,292 झाली आहे.

लंडनमधील इम्पेरिअल महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच साथरोग शास्त्रज्ञ रॉबिन शट्टॉक यांनी सांगितले की, आम्ही या लसीच्या परिणामकारतेबद्दल छातीठोक आहोत. पण प्रचलित संकेतानुसार आधी या लसीचे कोरोनाबाधित जनावरांवर परीक्षण केले जाईल.त्यानंतर कोरोनाबाधित माणसांवर ती आजमावली जाईल. यासाठी किमान दोन-तीन वर्षे लागू शकतात. या क्षणापर्यंत कोरोनावर कुठलीही लस उपलब्ध नाही तसेच नेमकी उपचार पद्धतीही कुणाला ज्ञात नाही. जे रुग्ण बरे होत आहेत, ते डॉक्टरांनी निदानानुसार आपल्या विवेकबुद्धीनुसार ठरविलेल्या उपचार तंत्राच्या तसेच रुग्णाच्या उपजत रोगप्रतिबंधक क्षमतेच्या बळावर बरे होत आहेत. ही लस परिणामकारक ठरल्यास वैद्यकीय क्षेत्रातील तो मैलाचा दगड ठरणार आहे.

चीनमधून रस्त्यानेही बंदी

भारतीय इमिग्रेशन अधिकार्‍यांनी सांगितले की, कुठलाही परदेशी नागरिक जो 15 जानेवारीपर्यंत चीनला गेलेला होता, त्याला भारतात येऊ दिले जाणार नाही. रस्ते मार्गावरूनही ही बंदी असेल. तथापि हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमधील चिनी पासपोर्टधारकांवर हे निर्बंध लागू नसतील.

4792 कोटींची गरज जगभरातील 21 देशांनी मिळून चीनला या आजाराशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत दिली आहे. विषाणूशी लढण्यासाठी जगभरातील देशांनी मिळून 4792 कोटी रुपये दान म्हणून द्यावेत, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे.

1230 वर लोक बरे झाले

चीनमध्ये आजअखेर 1230 रुग्ण कोरोना संक्रमणमुक्‍त होऊन बरे झालेले आहेत. कोरोनाचा कहर असलेल्या हुवेई प्रांतातच 671 रुग्ण बरे झाले आहेत. थायलंडमध्ये  5, जपानमध्ये 1, व्हिएतनाममध्ये 1 युवक बरा झाला आहे. थायलंडमध्ये आढळलेला पहिला कोरोना संक्रमित रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुहानमधील स्पोर्ट्स सेंटर, व्यायामशाळा, प्रदर्शन सभागृह अशा स्वरूपाची 11 ठिकाणे तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये परिवर्तित करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिरिक्‍त 10 हजार खाटांची व्यवस्था झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *