महाराष्ट्रातला लॉकडाउन कायम, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील- राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील लॉकडाउन या विषयावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाउन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.

यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाउनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं मत लॉकडाउन लगेच काढणं शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्यानं सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाउनसंदर्भातील चित्र स्पष्ट झालं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसं असेल, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *