मराठा आरक्षण; संभाजीराजेंच्या भूमिकेचे राज ठाकरेंकडून समर्थन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षण देणारा कायदाच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या चर्चेला तोंड फुटले असून आता हे आरक्षण कसे मिळवता येईल, यावर खलबते सुरू आहेत. एकीकडे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील समांतरपणे मराठा आरक्षणाविषयी हालचाल करायला सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. संभाजीराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दुपारी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चर्चेचा वृत्तांत सांगितला.

संभाजीराजे भोसले यांनी या भेटीविषयी बोलताना राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीचा देखील दाखला दिला. राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. जात-पात ते मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे ते आहेत. ते माझ्या भूमिकेचे समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नाते छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे आजही आहे. शिवाय किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर देखील आमचे एकमत असल्यामुळे किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाल्याचे संभाजीराजे म्हणाले.

माझ्यासाठी नाही तर समाजासाठी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची मी भेट घेत आहे. पवार साहेबांना सकाळी भेटलो. उद्या देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनाही भेटणार आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. त्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यातून मार्ग काढण्याची फक्त माझीच जबाबदारी नाही तर सर्व पक्षांची आहे. समाजाला न्याय मिळावा, यासाठीचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *