महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे ।कोरोना उत्पत्तीमागील चीनच्या पापाचा घडा भरला आहे. अवघ्या जगाला हैराण करणारा कोरोना विषाणू नेमका आला कोठून याचा 90 दिवसांच्या आत शोध घ्या, यासाठी दुपटीने प्रयत्न करून अहवाल सादर करा, असे सक्त आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या देशातील गुप्तचर यंत्रणेला दिले आहेत. अमेरिकेच्या या कडक भूमिकेमुळे चीनचे धाबे दणाणले आहे.
कोरोना जगभरात पसरण्याच्या महिनाभर आधी म्हणजे नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान प्रयोगशाळेतील काही संशोधक आजारी पडले होते. त्यांना रुग्णालयातही दाखल केले होते, अशी धक्कादायक माहिती नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे बायडेन यांच्यावर जनतेचा दबाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोनाच्या उत्पत्तीचा सखोल तपास करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. विषाणूविषयी ठोस माहिती गोळा करा, जेणेकरून विषाणू उत्पत्तीच्या निष्कर्षापर्यंत वेळीच पोहोचता येईल. तसेच चौकशीची गरज असलेल्या इतर ठिकाणांची यादी सादर करण्याचेही आदेश बायडेन यांनी दिले आहेत. कोरोना कोणत्या संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे मनुष्यापर्यंत पोहोचला की प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती केली, याबाबत सध्या ठोस पुरावे नाहीत. हेच पुरावे मिळवण्यासाठी अमेरिकेने तपासाला दुप्पट गती दिली आहे. या मोहिमेत अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळाही भाग घेणार आहेत. बायडेन यांनी चीनला आंतरराष्ट्रीय चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले आहे.
अमेरिका जगभरातील इतर मित्रराष्ट्रांना सोबत घेऊन चीनचा बुरखा फाडणार आहे. हे विविध देश चीनवर समग्र, पारदर्शक, ठोस पुरावे तसेच आवश्यक आकडेवारी सादर करण्यासाठी दबाव टाकणार आहेत. कुठलाही ठोस निष्कर्ष नसेल तर चीनचे सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवरील चौकशीला सहकार्य करणार नाही. त्याच अनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर यंत्रणांना दुपटीने कामाला लागण्याचा आदेश दिला आहे.