महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आलीये, असे म्हटले.
ते पुढे म्हणाले की, ‘कोरोना काळात माणूस जगणे महत्वाचे आहे. आंदोलन करायचे असेल तर लोकांना वेठीस धरू नका. सर्वांना आवाहन करतो की आधी माणूस जगला पाहिजे. आंदोलन करून नाही तर सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित आणून मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. मी कुणालाच घाबरत नाही, कारण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची आयडिओलॉजी घेऊन गरीब मराठा समाजासाठी काम करतोय. माझे राजकीय सामाजिक नुकसान होणार, मी घाबरत नाही. मी लवकरच मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेते, राजसाहेब, पवार साहेब, प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहे सर्वांना विनंती आहे की या समाजाला बाहेर फेकू नका. लोक मला छत्रपतींचे वंशज म्हणतात, मान सन्मानाचे बोलतात पण सगळे बाजूला ठेवून मी आधी हात जोडून विनंती करतो राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित या.
यावेळी संभाजी राजे यांनी 6 जून म्हणजेच, शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले आहे. 6 जून रोजी काय झाले, शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार.