महाराष्ट्र २४ – मुंबई – महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील कार्यालये, बॅंका, रेल्वे; तसेच टपाल कार्यालयांत त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.
केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रिभाषा सूत्राचे पालन करत नाहीत. त्रिभाषा सूत्रामध्ये दंडाची किंवा शिस्तभंगाच्या कारवाईची कोणतीही तरतूद नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होते. संबधित विभागांना तत्काळ आदेश देऊन मराठी भाषा वापरण्याबाबत सूचित करावे, असे पत्र देसाई यांनी शहा यांना पाठविले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील अनेक कार्यालये, राष्ट्रीयीकृत बॅंका, रेल्वे यामध्ये मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत सूचना देऊन त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.