24 तासात केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता ; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । केरळातील अनेक भागात ढगाळ आणि अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केरळमधील 14 ठिकाणावर चांगला पाऊस होत आहे. तसेच उद्यापासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनच्या आगमनासाठी भारतीय किनारपट्टी भागांमध्ये पूरक वातावरण तयार होत असतानाच दोन चक्रीवादळे निर्माण होऊन गेली असली, तरीही मॉन्सून काही वाट चुकलेला नाही. कारण, ठरल्याप्रमाणे हा दरवर्षी येणारा आणि हवाहवासा मॉन्सून येत्या 24 तासात केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, कोकणात रत्नागिरी आणि मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तसंच विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासात पावसाचा इशारा हवामान विभाग तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

महाराष्ट्रात सरासरी 11 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे. एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल, असे सांगण्यात येत आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार असल्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस हा अत्यंत महत्वाचा असतो. या मान्सुनच्या पावसावरच खरीप हंगामातील पिकांची पेरणी अबलंबून असल्याने भारतीय शेतीवर मान्सुनचा मोठा परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *