चिंताजनक ; करोनामुक्त झाल्यानंतर दिसताहेत आजाराची ‘ही’ लक्षणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक अनारोग्याच्या तक्रारींचा त्रास मुंबईकरांना होत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण वीस टक्के इतके असून करोनापश्चात २२.२२ टक्के व्यक्तीच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या टप्प्यामध्ये संसर्गमुक्त मुंबईकरांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

पी नॉर्थ या प्रभागामधील २५ ते ५० या वयोगटातील एक हजार व्यक्तींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात दीर्घकाळ सर्दी, अंगदुखी, थकवा, केसगळतीचा त्रास, श्वास घेताना त्रास होणे, अस्वस्थता येण्याची लक्षणे यातील बहुतांश रुग्णांमध्ये दिसून आली. करोना उपचार पद्धतीमध्ये दिल्या जाणाऱ्या स्टिरॉइडमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याने त्याच्या वापराबाबत योग्यप्रकारे नियोजन करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती देताना पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा अभ्यास महत्त्वाचा दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. करोनापश्चात कोणत्या वयोगटामध्ये कोणत्या लक्षणांची तीव्रता अधिक आहे, हे स्पष्ट होत असल्याने उपचारामधील वैद्यकीय व्यवस्थापनाची दिशा निश्चित करण्यास मदत होईल, असे सांगितले.

या एक हजार जणांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये २० टक्के रुग्णांमध्ये एक महिन्यानंतरही करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. सर्वाधिक लक्षणे ही ४६ ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून आली असून हे प्रमाण ४०.६८ टक्के इतके आहे. सर्वात कमी लक्षणे ही ३६ ते ४० या वयोगटामध्ये होती, हे प्रमाण ८.७५ टक्के इतके असून लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांध्ये गंध, चव नसणे तसेच थकवा तसेच सातत्याने सर्दी- खोकला ही लक्षणे सर्वेक्षणामध्ये दिसून आली आहे. १३ टक्के व्यक्तींमध्ये केसगळतीच्या तक्रारी दिसून आल्या आहेत.

या सर्वेक्षणामध्ये करोनापश्चात नैराश्याचे तसेच मानसिक आजारांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. मात्र झोपेशी संबधित तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. झोप सलग न लागणे, मध्येच जाग येणे, झोपेचा पॅटर्न बदलणे, दिवसा झोप येत असल्याचेही मुंबईकरांनी सांगितले. मानसोपचारतज्ज्ञ मानसी श्रृंगारपुरे यांनी, झोप व्यवस्थित पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे मानसिक अनारोग्याची लक्षणे ही करोनापश्चात वेगवेगळ्या टप्प्यावर दिसू शकतात. त्यामुळे आहार, जमेल तितका व्यायाम आणि झोप हे तिन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *