महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून । सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर १३ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी मापदंड निश्चित करेल. समितीला १० दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, मूल्यांकन करून निकाल जाहीर होतील. मूल्यांकनाच्या निकष निश्चितीसाठी समितीत भारद्वाज यांच्यासह संयुक्त शिक्षण सचिव विपिनकुमार, केंद्रीय विद्यालय आयुक्त निधी पांडे, नवोदय विद्यालय आयुक्त विनायक गर्ग, शाळांचे दोन प्रतिनिधी, काही राज्यांतील संस्थांचे अधिकारी यांचाही समावेश आहे.
२०२१-२२ पासून दोन नवीन अभ्यासक्रम : सीबीएसई २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून आपल्या शाळांत कोडिंग आणि डेटा सायन्सचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या दोन्ही नव्या अभ्यासक्रमांचा उद्देश मुलांमधील तार्किक क्षमता वाढवणे हा आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी ट्वीट करून त्याची घोषणा केली. सीबीएसईने शाळांना दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार म्हटले आहे की, इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १२ तासांचे स्किल माॅड्यूल म्हणून कोडिंगचा समावेश केला जाईल. डेटा सायन्स विषय इयत्ता आठवीसाठी १२ तासांचे स्किल मॉड्यूल म्हणून समाविष्ट केला जाईल. नंतर अकरावी-बारावीत तो कौशल्य (स्किल) विषय म्हणून समाविष्ट केला जाईल.