EURO CUP 2020 : गोलशून्य बरोबरीत सुटला स्पेन विरुद्ध स्वीडन सामना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । युरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरमध्ये सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसऱ्या हाफनंतर पाच मिनिटं वाढवून देण्यात आली तरी कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला मात्र स्वीडनचा शक्तीशाली डिफेन्स त्यांना तोडता आला नाही. करोनाचा फटका बसलेल्या स्पेनने हा सामना खेळताना करोना संकटाची झलक आपल्या खेळात दिसू दिली नाही हे विशेष.

स्पेन आणि स्वीडनची तुलना केल्यास स्वीडनपेक्षा स्पेनचा संघ खूपच सरस होता. मात्र रॉबील ओल्सेन, ग्रीरार्ड मोरीनो आणि अल्वोरो मोराता यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमावल्याने संघाला एकही गोल करताना आला नाही. दुसरीकडे स्वीडननेही स्पेनला एकीकडे गोल करुन दिले नाहीत तर दुसरीकडे त्यांनाही स्वत:साठी गोलच्या संधी निर्माण केल्या होत्या. अॅलेक्झॅण्डर इसाकने मारलेला एक अप्रतिम पास मार्कस बर्जकडे गेला मात्र त्याला त्याचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही.

करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्जिओ बसक्युटस आणि बचाव फळीतील डिआगो लॉरेन्टी हे स्पेनचे मुख्य खेळाडू आहे. त्यांना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत आयसोलेशनमध्ये रहावं लागलं होतं. त्यामुळे या दोघांना एकत्र सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

सामन्यातील निर्धारित ९० मिनिटांच्या खेळाबरोबरच ६ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देऊनही सामना गोलशून्य बरोबरीमध्ये सुटला. सामना बरोबरीत सुटला असला तरी या सामन्यात स्पेन विजयी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बचाव फळीने केलेल्या कामगिरीच्या जोरावर स्पेनचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात स्वीडनला यश आलं. सामान्यामधील स्पेनच्या वर्चस्वाचा अंदाज यावरुन बांधता येईल की बॉल पझेशन म्हणजेच चेंडू स्वत:कडे ठेवण्याची स्पेनची टक्केवारी ही ८६ इतकी होती तर स्वीडनकडे एकूण वेळेपैकी केवळ १४ टक्के वेळ चेंडू होता. शॉर्ट ऑन टार्गेटमध्येही स्पेनचे पाच तर स्वीडनचा एक प्रयत्न दिसून आला. स्पेनच्या संघाने तब्बल ९१७ पास केले तर स्वीडनच्या संघाने केवळ १६२.

स्पेन संघाचे व्यवस्थापक लुईस इनरीक यांनी संघाला कर्णधार सर्जीओ रामोसला दुखापतीचं कारण देत संघातून वगळण्याचा निर्णय घेतल्याने ते सामन्यापूर्वीच चर्चेत होते. लुईस यांनी रिअल माद्रीद संघासाठी खेळणाऱ्या एकाही खेळाडूला अंतीम २४ जणांच्या संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळेच अनेक फुटबॉल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *