महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । तुम्ही लस घेतल्यानंतर सरकारने जारी केलेले लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर केले असेल तर सावध व्हा. कारण, त्यामुळे तुमचा खासगी डेटा लीक होऊ शकतो. केंद्रीय गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, लसीकरण प्रमाणपत्रात नाव, वय, लिंग आणि पुढील डोसच्या तारखेसह महत्त्वाची माहिती असते, ती गुन्हेगारांना मदतीची ठरू शकते. गृह मंत्रालयाने त्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर (सायबर मित्र) एक पोस्टरही जारी केले आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, प्रमाणपत्रावरील क्यू-आर कोड स्कॅन करताच इतर डिटेल्सही मिळतात. आरोपी फोनवर बोलतो आणि आपण सरकारी कर्मचारी आहोत असे सांगून व्यक्तीची खासगी माहिती सांगतो. त्याद्वारे विश्वास संपादन करून ओटीपी आणि इतर खासगी माहिती मिळवतो. या प्रकरणी जालंधरचे सायबर क्राइमचे एसपी रविकुमार यांनी सांगितले की, लसीकरण प्रमाणपत्रात अनेक लोकांनी पुरावा म्हणून आपले पॅन कार्ड दिले आहे. त्यामुळे सायबर ठकांकडे आर्थिक डेटा जातो, त्याद्वारे ते लोकांना आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात.
लक्षात ठेवा : ओटीपी किंवा खासगी माहिती देऊ नका
1. दुसरा डोस घेतल्यानंतरच आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
2. सोशल मीडियावर सर्टिफिकेट शेअर करू नका.
3. लसीकरणाबाबत कुठलाही कॉल आल्यावर खासगी डेटा किंवा ओटीपी शेअर करू नका.
4. लसीकरणाबाबत कुठलाही फेक मेसेज किंवा लिंक पुढे पाठवू नका.
5. कोणीही व्यक्ती असे करत असेल तर त्याला त्वरित जागरूक करा.