जगातील सर्वात लहान सर्टिफाईड योगा टीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. 22 जून – २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. आज जगभरात कोट्यावधीच्या संख्येने योग शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. जगातील सर्वात लहान वयाचा सर्टिफाईड योगा टीचर चीन मध्ये असून या मुलाचे नाव आहे सून चुआंग. इतक्या लहान वयात हा मुलगा सेलेब्रिटी योगगुरु बनला असून कठिणातील कठीण आसने तो लीलया करतोच पण लोकांना सुद्धा शिकवितो. पीपल्स डेली या चीनी वृत्तपात्रातील माहितीनुसार या चिमुकल्या योगगुरुची कमाई १६ हजार डॉलर्स म्हणजे १०.९० लाख रुपये आहे. चीन मधील हा सर्वात लहान, सर्वाधिक धनवान मुलगा आहे.

सून प्राचीन भारतीय योग शिकवतो. चीनी लोकांना एक इंग्रजी नाव असते. तसे सूनचे नाव आहे माईक. चीनच्या झोजीयांग भागात राहणारा सून अतिशय लोकप्रिय योग टीचर आहे. दोन वर्षाचा असतानाच त्याने योग प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. सून ऑटीझम म्हणजे स्वमग्न या आजाराने ग्रस्त असल्याचे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आल्याबरोबर आईने त्याला योग सेंटर मध्ये नेऊन आसने शिकवायला सुरवात केली. वर्षभरात त्याने ही कला उत्तम प्रकारे आत्मसात केली शिवाय त्याचा आजार बरा झाला हा फायदा सुद्धा मिळाला.

योगसाधने मधील काही आसने ऑटीझम विकारावर फार उपयुक्त मानली जातात. शिवाय मानसिक शारीरिक विकास होण्यास मदत मिळते. सून अजूनही खूप बोलत नाही पण वयाच्या सातव्या वर्षीपासून तो योगासने शिकवतो आहे. त्याने आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना योगशिक्षण दिले आहे.

२०००च्या दशकात चीन मध्ये भारतीय योग लोकप्रिय होऊ लागला. फिटनेस साठी त्याचा अधिक वापर होतो. आजघडीला चीन मध्ये १०,८०० नोंदणीकृत योगकेंद्रे असून लाखो लोक योगाभ्यास करतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव दिला होता तेव्हा चीनने त्याचे समर्थन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *