महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती सतावत असतानाच लहान मुलांच्या लसीबाबत मोठी खूशखबर समोर आली आहे. देशात पुढील तीन महिन्यांतच म्हणजे सप्टेंबरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल. दोन वर्षांपुढील मुलांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यासंदर्भातील दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणीचा अहवाल सप्टेंबरमध्ये येईल व याच महिन्यात ही लस मुलांना टोचण्यासाठी मंजुरी मिळेल, असे दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी सांगितले.
गुलेरिया यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना ही खूशखबर दिली. फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला हिंदुस्थानात मंजुरी मिळाल्यास लहान मुलांसाठी त्या लसींच्या रूपात दुसरा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन देशात लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्याच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. सध्या दिल्ली आणि पाटण्यातील एम्समध्ये 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी केली जात आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 12 मे रोजी या चाचण्यांसाठी भारत बायोटेकला परवानगी दिली होती. दुसरीकडे पॅडिलाच्या जायकोव-डी लसीचीसुद्धा 12 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांवर चाचणी सुरू आहे. पॅडिलाकडून लवकरच 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. लहान मुलांना लस उपलब्ध करण्यासाठी चहूबाजूंनी सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे लहानग्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेत इतरांच्या तुलनेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा निष्कर्ष याआधी काढण्यात आला आहे. मात्र या निष्कर्षावर विश्वास ठेवण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.