महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । कोरोनावरील ‘कोव्होव्हॅक्स’ या लशीची पहिली बॅच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये या आठवड्यात तयार होत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या या लशीला भारतात ‘कोव्होव्हॅक्स’ म्हणून ओळखले जाणार आहे. लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या अजून सुरु असून, सुरवातीचे निकाल सकारात्मक आहे.
जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनिकाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्रकल्पामध्ये करण्यात येत आहे. आता त्याचबरोबरच नोव्हाव्हॅक्स लशीचे उत्पादनही येथे सुरू झाले आहे. यासंबंधी माहिती देताना पूनावाला म्हणाले की,‘‘या आठवड्यात तयार होणाऱ्या कोव्होव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे साक्षीदार बनताना रोमांचकारी अनुभव येत आहे.
अठरा वर्षांखालील आपल्या या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता या लशीमध्ये आहे. चाचण्या अजूनही चालू आहे.’’ रशियाच्या स्पुटनीक-व्ही या लशीच्या उत्पादनासाठीही सीरम इन्स्टिट्यूटला प्राथमिक परवानगी देण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड आणि स्पुटनीक-व्ही ला भारतात आपत्कालीन वितरणासाठी परवानगी आहे. मात्र कोव्होव्हॅक्स संदर्भात अजूनही निर्णय नाही. अठरा वर्षांखालील बालकांवर जुलैमध्ये या लशीच्या चाचण्या सुरू होतील, असा विश्वास सीरम इन्स्टिट्यूटने व्यक्त केला आहे.