महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोमवारी (ता. २८) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील आठवडाभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चिंतेत होते. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र रविवारी बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पेरण्यांसाठी जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे. रविवारी कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
मंगळवारनंतर (ता.२९) राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.२८) ते रविवार (ता. ४) दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरात आणि जिल्ह्यात रविवारी बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यात घाटमाथ्यावर सोमवारी (ता. २८) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात दुपारी किंवा सायंकाळनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.