महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) शासनाने ठरवून दिलेल्या संख्येनुसार प्रातिनिधिक वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. २) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान होईल. माउलींच्या पादुकांचे देऊळवाड्यातून प्रस्थान झाल्यानंतर सोहळा आजोळघरीच सतरा दिवसांच्या मुक्कामी राहील. दरम्यान, बुधवारी (ता. ३०) प्रस्थानासाठी आलेल्या जवळपास तीनशे वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी देवस्थानच्यावतीने करण्यात आली. (Police Bandobast in Alandi for Ashadhi Wari)
कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करता येत नसल्याची खंत वारकऱ्यांना आहे. मात्र शासनाने परवानगी दिलेले मर्यादित संख्येतील वारकरी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. खबरदारी म्हणून आळंदीत पासधारकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, गोपाळपुरा, महाद्वार आणि मंदिर परिसरात संचारबंदी असल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड लावले आहेत. इंद्रायणीकडे जाणारे मार्गही बंद केले.
दरम्यान, शुक्रवारी (ता.२) माऊलींच्या पादुकांचे दुपारी चार ते सहाच्या दरम्यान पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानासाठी आळंदी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. देऊळवाड्यात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रस्थानासाठी आलेल्या जवळपास तिनशे वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.पुणे जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे हे प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने त्यांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले की, सोहळ्यातील साडे चारशे दिंड्यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. काहींनी डेल्टा प्लसचा संभाव्य धोका पाहून आळंदीत येणे शक्य नसल्याचे सांगितले. तरिही तिनशे वारकऱ्यांची चाचणी आज झाली.