महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । मुंबई । बोगस मतदानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपाय योजण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादीत फोटो नसल्यास मतदाराचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे.मतदार याद्यांमध्ये मतदाराचे छायाचित्र समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आग्रही आहे. त्यामुळे मतदाराचा फोटो व इतर आवश्यक माहिती समाविष्ट करण्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेळोवेळी सुरू असते.
मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदाराच्या घरी जाऊन छायाचित्र गोळा करण्याचे कामही मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करीत आहेत. आतापर्यंत 1 लाख 18 हजार मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्यामुळे ज्या मतदारांचा फोटो मतदार यादीत नाही, त्यांनी 8 जुलैपूर्वी मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात जाऊन फोटो जमा करावेत अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील असा इशारा मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिला आहे.
तर नावे वगळणार…
ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाही, त्यांनी वेळेत छायाचित्र जमा करावे अन्यथा संबंधित मतदार हा मतदारसंघातून स्थलांतरित झाला आहे किंवा त्या मतदारसंघात वास्तव्य करीत नाही असे गृहित धरून संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
वेबसाईटला भेट द्या
मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदारसंघाच्या कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.electionmumbaicity.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.